जिल्ह्यातील ८४ मंडळात अतिवृष्टी – ३ हजार ४९७ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर पुराच्या पाण्यात अडकलेल्या ६० नागरिकांची प्रशासनाने केली सुटका

संतोष औताडे- मुख्य संपादक ,नेवासा. दिनांक -28/09/2025
अहिल्यानगर जिल्ह्यातील ८४ मंडळात अतिवृष्टी – ३ हजार ४९७ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर पुराच्या पाण्यात अडकलेल्या ६० नागरिकांची प्रशासनाने केली सुटका
अहिल्यानगर, जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे १२४ पैकी ८४ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या ३ हजार ४९७ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अनेक ठिकाणी महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकांच्या मदतीने ६० नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
अतिवृष्टी मंडळे :
अहिल्यानगर तालुक्यातील १२ मंडळात अतिवृष्टी झाली. पारनेर ६, श्रीगोंदा २, कर्जत ४, जामखेड ७, शेवगाव ८, पाथर्डी ९, नेवासा १०, राहुरी ८, संगमनेर १, कोपरगाव ६, श्रीरामपूर ५ तर राहाता ६ अशा एकूण ८४ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
नागरिकांचे स्थलांतर :
महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकांच्या मदतीने अहिल्यानगर मधील स्थलांतर करण्यात आले. जामखेड तालुक्यात ४२, कर्जत ४५६, कोपरगाव २००, नेवासा ६५९, राहुरी ४९८, संगमनेर ८४, शेवगाव ७६, श्रीरामपूर ७४ तर राहाता तालुक्यातील १ हजार ३९९ व्यक्ती सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
बचावकार्य :
सरला, ढोकसरी (ता. श्रीरामपूर) येथील ३ कुटुंबांतील ७ व्यक्तींना नगरपालिका टीमने सुरक्षित ठिकाणी हलवले.
भोकर शिवारातील पांढरे वस्त्यांमधील पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६ व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
कोल्हार बु., ता. राहाता येथील गावाच्या कडेलगत असलेल्या वस्तीतून ८ नागरिकांची सुटका करण्यात आली.
साकोरी शिवरस्ता, ता. राहाता येथे नगर–मनमाड रस्त्यावरील हॉटेल फाऊंटनजवळील नाल्यात वाहून जात असताना अक्षय गोरे व अमोल व्यवहारे यांची सुटका करण्यात आली. पाण्यात वाहून गेलेले रोहित खरात व प्रसाद विसपुते यांचे मृतदेह आढळून आले आहेत.
मौजे वारी, ता. कोपरगाव येथील टेके वस्तीत पाण्यात अडकलेल्या २७ व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून अद्यापही ६ व्यक्ती अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील चौंडी गावास पाण्याचा वेढा बसला असून ७० टक्के लोक गडावर गेलेले आहेत तर ३० कुटुंबे अण्णासाहेब डांगे आश्रमशाळेत आहेत. उर्वरित ३० टक्के नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
शेवगाव तालुक्यातील मौजे देवटाकळी येथील रेडी नदीला आलेल्या पुरामुळे नदीशेजारील अडकलेल्या कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
वाघमारे वस्तीवरील सर्व कुटूंबांना तीन मजली बिल्डिंगमध्ये सुरक्षित हलविण्यात आले आहे.
पूर परिस्थिती निर्माण झालेल्या तालुक्यातील नागरिकांचे गावातील शाळा तसेच नातेवाईकांकडे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले.
जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे घराची भिंत कोसळून पारुबाई किसन गव्हाणे, वय ६८ वर्षे ह्या मयत झाल्या आहेत.
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील पिराजी भीमराव पिटेकर, वय ८० वर्षे यांचा राहत्या घराची भिंत कोसळुन मृत्यू झाला आहे.
नेवासा तालुक्यातील भानसहिवरे ते रांजणगाव रोडवरील नदीच्या पुलावरुन रस्ता ओलांडत असताना महेंद्र लाजरस मकासरे, वय २८ वर्षे हे ५ वाजेच्या सुमारास वाहून गेले आहेत.
२७ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे नुकसानीचा प्राथमिक अंदाज :
२९ दुधाळ जनावरे, १६ लहान जनावरे तसेच २ हजार ६४५ कुक्कुट पक्षी मृत झाले. १८ गोठे नष्ट झाले. ५९९ कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले असून १ घराचे पूर्णतः नुकसान झाले. ३५५ घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ३१३ गावांमधील २ हजार ६८ विहिरींचे नुकसान झाले.
धरणांमधून विसर्ग (२८ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वा.)
दौंड पूल : ३०,७००
नांदूर मध्यमेश्वर : ८७,५४९
जायकवाडी : २,२६,६३८ क्युसेक
भंडारदरा : १०,८९६ क्युसेक
निळवंडे : १४,२००
ओझर बंधारा : ८,०७५
मुळा : १०,००० क्युसेक
घोड : ३५,००० क्युसेक
सीना : २७,८०० क्युसेक
येडगाव : ७,२००
विसापूर : ४,२१५
खैरी : ४,७९१ क्युसेक
सीना धरणाचाा विसर्ग वाढल्यामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पाणी पातळी वाढत असून ग्रामस्तरीय यंत्रणा कार्यरत आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीत पावसामुळे कल्याण रोडवरील नवीन पुलाच्या बांधकामाजवळील रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरातील नेपती नाका परिसरात सीना नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात पसरल्याने पर्यायी मार्गांचा वापर सुरू आहे.
शेवगाव तालुक्यात एस.डी.आर.एफ. चे पथक तर कर्जत तालुक्यामध्ये एन.डी.आर.एफ.चे पथक दाखल झाले आहे.