संतोष औताडे (मुख्य संपादक- नेवासा) दिनांक-01/12/2022 महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहचवणे गरजेचे : आ. जगताप
‘स्नेहबंध’चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान
अहमदनगर – क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे हे करत आहेत. महापुरुषांचे पुतळे आणि स्मारके उभे करून चालणार नाही तर त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथी निमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले कृती समितीच्या वतीने स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, विशाल गणेश देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, हिंद सेवा मंडळाचे उपाध्यक्ष संजय चोपडा, ओबीसी सेलचे अमित खामकर, अशोक बाबर आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, फुले दांम्पत्यांनी केलेला त्याग व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी शहरात लवकरच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा एकत्रितपणे पूर्णाकृती पुतळा उभा राहणार आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून समाजाला एक प्रेरणा व दिशा मिळणार आहे. उद्धव शिंदे यांच्या सामाजिक कार्यातून इतरांना प्रेरणा मिळून समाज सुधारण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. विधाते म्हणाले, महात्मा फुले यांनी दीनदुबळ्यांना आधार देऊन त्यांच्या उध्दारासाठी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचे शस्त्र सर्वसामान्यांना दिले. फुले दांम्पत्यांचे कार्य व त्यागाने समाज सावरला. त्यांच्या प्रेरणादायी कार्याची जाणीव ठेऊन समाजात योगदान देणार्यांचा सन्मान करण्यात आला. शाल, फेटा व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सत्काराला उत्तर देताना उद्धव शिंदे म्हणाले, समतेचे दैवत महात्मा फुले यांच्या नावाने समता पुरस्कार प्राप्त झाला ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा माझ्यासाठी मोठा सन्मानच आहे.