ब्रेकिंग
Trending

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा पवित्र धर्मध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संपन्न.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा                        दिनांक -31/10/2026        नाशिक-त्र्यंबकेश्वर  येथील सिंहस्थ कुंभमेळा पवित्र धर्मध्वजारोहण महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संपन्न.         सविस्तर माहिती- सविस्तर माहिती-  हजारो वर्षांच्या श्रद्धेचा वारसा… प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी… भगवान शंकराच्या सान्निध्याने पुनीत झालेले त्र्यंबकेश्वर आणि कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा अखंड प्रवाह असलेली गोदामाई! अशा पवित्र वातावरणात नाशिकच्या गोदातीरावर श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश घुमला. सिंहस्थ कुंभपर्व हे केवळ धार्मिक आयोजन नसून भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचा उत्सव आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या पवित्र धर्मध्वजारोहण सोहळ्यानिमित्त गोदाघाटावर आयोजित महागोदा आरती कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होत्या. यावेळी त्यांनी व इतर मान्यवरांनी गोदापूजन केले. ‘पवित्र नाशिक नगरीला माझा नमस्कार’ अशा मराठी शब्दांत भाषणाची सुरुवात करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला येण्याचा विशेष आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, उपस्थित होते .महाराष्ट्राची भूमी ही अमृतभूमी आहे. या पावन भूमीला मी कोटी कोटी प्रणाम करते,’ अशा शब्दांत राष्ट्रपतींनी महाराष्ट्राविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाने कृतार्थ झाल्याचे सांगताना भगवान शंकराचे पावन सान्निध्य लाभलेली त्र्यंबकेश्वरची भूमी, प्रभू श्रीरामांच्या वनवासाच्या स्मृती जपणारी नाशिकची तपोभूमी आणि सर्वांना आशीर्वाद देणारी गोदावरी नदी यांचे आध्यात्मिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. गोदावरीच्या महाआरतीत सहभागी होण्याचा मान मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पवित्र धर्मध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले. सिंहस्थ कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असून, जात-पात, धर्म किंवा सामाजिक भेदांच्या पलीकडे जाऊन सर्वांना अध्यात्माच्या धाग्याने जोडणारा श्रद्धेचा महासंगम असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिकची भूमी आणि गोदावरी नदीचे अनन्यसाधारण आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करताना आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ऐतिहासिक आणि भव्य आयोजन महाराष्ट्र शासन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी गोदावरीच्या स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याबरोबरच सामाजिक संस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

गोदावरीच्या महागोदा आरतीसाठी ६ हजार ५०० आदिवासी बांधव सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना सनातन संस्कृतीच्या जतनात आदिवासी जनजातींचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी सिंहस्थ कुंभपर्व भव्य, दिव्य आणि सुंदर करण्याबरोबरच नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आगामी सिंहस्थासाठी जगभरातून सुमारे १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज असून त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र शासन सज्ज झाले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित न राहता या परिसराच्या भविष्याला नवी दिशा देतील. संत-महंत आणि भाविकांसोबतच सामान्य कष्टकऱ्यांच्या हाताला काम देणारा, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणारा हा आर्थिक महोत्सवही ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या या सिंहस्थाला प्रभू श्रीरामाचे कृपाछत्र आणि गोदामाईचा आशीर्वाद लाभेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे