अल्पवयीन पिडीत मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा”

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा दिनांक- 23/03/2025
राहुरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १७/१२/२०२२ रोजी रात्री ९ वा. वय वर्षे १२ असलेल्या अल्पवयीन पिडीत मुलगी हीस आरोपी नामे अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे व गणेश राजेंद्र चव्हाण यांनी तिच्या आईवडिलांच्या कायदेशीर रखवालीतून चेंडूफळ ता. वैजापूर. जिल्हा. औरंगाबाद येथे पळवून नेले. त्यानंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरूध्द भा.द.वि कलम ३६३, ३६६ नुसार फिर्याद दिलेली होती. पोलीस उपनिरीक्षक खोंडे पोलीस कॉन्स्टेबल इफ्तेकार सय्यद यांनी पिडीत मुलीचा शोध घेउन, पिडीत मुलगी तसेच आरोपी यांना दिनांक २४/१२/२०२२ रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर राहुरी पोलीसांनी पिंडीत मुलीचा जबाब नोंदविला, त्यावेळी पिडीत मुलीने सांगितले की, आरोपी अजय उर्फ विनायक गर्ज याने आरोपी गणेश राजेंद्र चव्हाण याचे मदतीने पिडीत मुलीला मोटारसायकलवर चेंडूफळ ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे पळवून नेले होते. त्यानंतर आरोपी गणेश चव्हाण हा पिडीतेला व अजयला तेथेच सोडून मागे निघून आला. चेंडूफळ येथे एका पडीक खोलीमध्ये आरोपी अजय उर्फ विनायक गर्जे याने पिडीत मुलीवर बळजबरीने अत्याचार केले. पिडीत मुलीचा जबाब घेतल्यानंतर राहुरी पोलीसांनी आरोपी विरुध्द भा.द.वि कलम ३७६ तसेच पोक्सो कायदा कलम ३, ४,५,६ नुसार कलम वाढ केली. सदर घटनेचा संपूर्ण तपास पोलिस उपनिरिक्षक चारूदत्त खोंडे यांनी करून मा. न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण १० साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी तसेच पिडीत मुलीचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात ग्रामसेवक, बारागाव नांदूर यांची साक्ष नोंदविण्यात आली. पिडीत मुलीची साक्ष ग्राहय धरली. या केसची सुनावणी चालु असताना सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, पिडीत मुलगी ही ाटनेच्या वेळी केवळ १२ वर्षे २ महिन्याची होती. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांचे मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने सदरची घटना केलेली आहे. त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वय वर्षे १२ वर्षे २ महिने असलेली अज्ञान मुलगी ही आरोपी विरूध्द काहीही कारण नसताना खोटे का सांगेल? त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील श्रीमती अॅड. मनिषा पी. केळगंद्रे शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म.पो. का. रेश्मा अडसूळ, पो.कॉ. योगेश वाघ यांनी मदत केली.आरोपी नामे अजय उफ विनायक राजेंद्र गर्जे, वय-२० वर्षे, रा. खडांबे खुर्द, ता. राहुरी, जि. अहमदनगर याने अल्पवयीन मुलीस पळवून नेउन तिचेवर अत्याचार केल्याप्रकरणी मा. विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस भा.द.वि. कलम ३६३, ३६६,३७६ (३), तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ४, ६, ८व १० या अन्वये दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३७६ (३) नुसार २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रु.५०००/- दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, भा.द.वि. कलम ३६६ नुसार ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रू. ३०००/- दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील श्रीमती अॅड. मनिषा पी. केळगंद्रे शिंदे यांनी काम पाहिले.
तसेच सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग श्रीमती स्वाती भोर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्री संदीप मेटके, तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे , लेखनिक पो. कॉ. / इफ्तेकार सय्यद, पोलीस उपनिरीक्षक बराटे, पोलीस हवालदार पालवे, पारधी यांनी केला.