शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये (स्कूलबस) सीसीटीव्ही कार्यान्वित करा – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा. दिनांक – 25/07/2025
सविस्तर माहिती- शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी बस व वाहने सुरक्षित असावीत यासाठी प्रत्येक वाहनामध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकतीच जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीची बैठक पार पडली. यावेळी श्री. घार्गे बोलत होते. बैठकीस महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, चंद्रकांत खेमनर आदी उपस्थित होते.

अवैध वाहतुकीविरोधात संबंधित विभागांनी संयुक्तपणे मोहिम राबवून दोषी वाहनांवर तातडीने कारवाई करावी. विद्यार्थ्यांची चढ-उतार फक्त शाळेच्या पार्किंगमध्येच सुरक्षितपणे होईल, यासाठी सर्व बसेस तिथेच उभ्या कराव्यात. रस्त्यावर धोकादायक पद्धतीने चढ-उतार करू नये.
प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापनाने जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी. तसेच सर्व शाळांनी परिवहन समितीच्या बैठका नियमित घेण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
स्कुल बस नियमावली प्रमाणे चिमुकल्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची प्रवासी क्षमता दीडपट असते. त्याहून अधिक मुलांना बसवून दाटी वाटीतून ने-आण करणाऱ्या चालकाला १० हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. अहिल्यानगर शहर व परिसरातील स्कूलबस चालकांनी फिटनेस प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. तसेच महिला मदतनीस ची देखील नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सर्व वैध कागदपत्रे तथा फिटनेस नसताना स्कूल बस रस्त्यांवर दिसल्यास त्या चालकावर गुन्हा सुद्धा दाखल करण्याचा इशारा ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
पालकांनीही आपली मुले ज्या वाहनातून शाळेत जातात, ते व्यवस्थित आहे का, चालक कसा आहे, याची खात्री करावी. प्रत्येक शाळांनी स्कूल बस कमिटीद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणींवर जाणून घ्याव्यात. अनफिट किंवा वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या बसवर आमचा सतत वॉच असेल, अशी ग्वाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.