अहिल्यानगर जिल्ह्यातील पुर परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहिर करावी -पंकज आशिया जिल्हाधिकारी
संतोष औताडे-मुख्य संपादक,नेवासा. दिनांक -15/09/2025
अहिल्यानगर जिल्ह्यातील पुर परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहिर करावी असे आदेश-पंकज आशिया जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सविस्तर माहिती-
राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील त्या – त्या भागातील स्थानिक
परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्याकरीता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे
अधिकार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
ज्याअर्थी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. उक्त नमूद संदर्भ क्र. 2 अन्वये नमूद शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार
संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.
ज्याअर्थी, जिल्ह्यातील 19 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील काही गावांमध्ये
पुरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच भारतीय हवामान खात्यातर्फे निर्गमीत संदेशानुसार जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात
आलेला आहे. त्यास्तव जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन ग्रामस्तरावर शालेय व्यवस्थापन समितीला शाळा बंद
करण्याचे अधिकार देणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, मी जिल्हाधिकारी अहिल्यानगर, मला प्राप्त अधिकारान्वये दिनांक 15/09/2025 व दिनांक 16/09/2025 या
दिवशी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकता असल्यास जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय शाळांना सुट्टी जाहिर
करण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला प्रदान करीत आहे.
सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह बैठकीचे आयोजन करून स्थानिक परिस्थितीचा
आढावा घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेणेत यावा. तथापि या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी
कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासंबंधी कामकाज करावे.