
संतोष औताडे (मुख्य संपादक- नेवासा ) दिनांक-20/10/2022
सविस्तर माहिती- अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मा.मनोज पाटील यांची बदली झाली असुन त्यांच्या जागी मा. राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश ओला हे सध्या पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे कार्यरत आहेत.ते एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि हसतमुख अधिकारी म्हणून राकेश ओला यांची ओळख आहे. राजस्थान येथील जयपूर मधील पोलिस घराण्यात त्यांचा जन्म झाला असुन. २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले राकेश ओला हे सरळ सेवा भरतीने सहायक ·पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली होती. त्यावेळी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीने अहमदनगरसह संपूर्ण राज्यात हैदोस घातला होता. या टोळीचा त्यांनी छडा लावून टोळीचे कंबरडे मोडले. मे १६ मध्ये त्यांची मालेगावला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. जातीय दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या मालेगावात त्यांनी मे २०१७ पर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली. तेथून ते जून २०१७ ला नागपुरात पोलीस उपायुक्त म्हणून बदलून आले. येथे त्यांना परिमंडळ दोनची जबाबदारी देण्यात आली. नागपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तोतया पोलीस बनून लुटणाऱ्या टोळीचा तसेच कारची काच फोडून रोकड आणि मौल्यवान चिजवस्तूंची बॅग लंपास करणाऱ्या टोळीचा त्यांनी छडा लावला. याशिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांचाही छडा लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमीका बजावली आहे. कोणत्याही स्थितीत शांतपणे आणि हसतमुख काम करण्याची त्यांची शैली त्यांना ‘कुल आॅफिसर’ म्हणून ओळख देऊन गेली आहे. अहमदनगर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चोरी, दरोडे आणि वाळू तस्करी या सारखी प्रमुख आव्हाने त्यांच्या समोर आसनार आहे.