संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक- 21/07/2022
एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती.
भारताला आज नव्या राष्ट्रपती मिळाल्या.. राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांनी एकतर्फी विजय मिळवला.. ‘यूपीए’चे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा या निवडणुकीत पराभव झाला..
द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिल्या आदिवासी समाजाच्या महिला राष्ट्रपती मिळाल्या.. शिवाय, त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. याआधी प्रतीभाताई पाटील यांनी राष्ट्रपतीपद भूषवले आहे..देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत. या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले होते. राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मुर्मू आघाडीवर होत्या. तिसऱ्या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांमधील ५० टक्के मते मिळाली. राष्ट्रपती पदासाठी 18 जुलैला मतदान झालं होतं. त्याची मतमोजणी आज होऊन निकाल जाहीर करण्यात आला.दरम्यान, येत्या 24 जुलैला विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.. त्यानंतर 25 जुलैला द्रोपदी मुर्मू या राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. द्रोपदी मुर्मू यांचा विजय निश्चित होताच, देशभरातील आदिवासी बांधवांनी जल्लोष करायला सुरुवात केली.. ठिकठिकाणी आदिवासी नृत्य सादर करुन द्रोपदी मुर्मू यांच्या विजयाचा आनंदा साजरा केला.. राष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल देशभरातून अभिनंदन केले जात आहे.