ब्रेकिंग
Trending

चोरीला गेलेले सोन्याचे दागिने नेवासा पोलीसांनी फिर्यादी महिलेला केले परत.

संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा, दिनांक -12/07/2025

सविस्तर माहिती– दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सौंदाळा येथे द्रोपदाबाई मुरलीधर आरगडे यांचे राहते घरी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तिन अनोळखी व्यक्तींनी येऊन जबरदस्तीने 8 ग्रॅम वजनाचा 56 हजार रुपये किमतीचा सोन्याचा सर चोरून नेले बाबत पोलीस ठाणे नेवासा येथे फिर्याद दाखल केली होती.
सदर घटनेची पोलीस ठाणे नेवासा, पोलीस निरीक्षक, धनंजय अ. जाधव यांनी तातडीने गांभीर्याने नोंद घेऊन तपास पथके नेमून अनोळखी आरोपींचा शोध सुरू केला होता. याच दिवशी संभाजीनगर शहरामध्ये देखील अशाच प्रकारे घरफोडी झाली होती व त्यामधील अनोळखी चोर हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते याची माहिती नेवासा पोलिसांना मिळताच सदरचे सीसीटीव्ही फुटेज युद्ध पातळीवर प्राप्त करून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तसेच सदरचे सीसीटीव्ही फुटेज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर यांना देखील शेअर करून आरोपींची ओळख पटवली असता आरोपी हे अत्यंत सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न होवुन त्यांची नावे 1. सचिन ईश्वर भोसले रा. बेलगाव ता. कर्जत 2. गाड्या उर्फ गाडेकर झरक्या चव्हाण 3. पैऱ्या उर्फ पैरेदार उमरका भोसले दोन्ही रा. नागझरी ता. गेवराई जि. बीड येथील असलेले समजले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर येथील पथकाने अथक परिश्रमानंतर सचिन ईश्वर भोसले, राहणार बेलगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर यास गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलसह शिताफीने जेरबंद केले होते. सदर आरोपीस अटक केल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आणखी पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली होती.
सौंदाळा तालुका नेवासा येथील गुन्ह्यात जे सोने जबरीने चोरून नेले होते ते परत मिळवण्यासाठी यातील फिर्यादी अशोक मुरलीधर अरगडे राहणार सौंदाळा यांनी नेवासा न्यायालयात विनंती अर्ज केला होता. मा. न्यायालयाने याबाबत नेवासा पोलिसांचे म्हणणे मागितले होता. नेवासा पोलिसांनी फिर्यादीस सोन्याचे दागिने परत करण्याबाबतचा सकारात्मक अहवाल दिल्यानंतर फिर्यादीचे जबरीने चोरून नेलेले सोन्याचे दागिने फिर्यादीस परत करण्याचे आदेश माननीय न्यायालयाने दिले होते. त्या प्रमाणे सदरचे सोन्याचे दागिने आज रोजी फिर्यादी नामे द्रोपदाबाई मुरलीधर आरगडे रा. सौंदाळा, ता. नेवासा यांना विधीवत त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे, या बाबत फिर्यादीने आनंद व्यक्त केला.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक ससाने, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पो. हवा. साठे, पो. कॉ. नारायण डमाळे, आप्पा तांबे, अमोल साळवे, अंबादास जाधव यांनी चोखपणे केला होता.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे